06 July 2013

पावसाळ्यातील भ्रमंतीची...

पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटूनही गेलेत. पर्यटनाची आवड असलेल्यांना आता पावसाळ्यातील भ्रमंतीचे वेध लागले असतील तर नवल ते काय? कारण मित्रांनो, पर्यटनाची-भ्रमंतीची आवड असलेल्यांनी केवळ उन्हाळ्यातील किंवा हिवाळ्यातील पर्यटनाच्या मर्यादेत राहण्याचे दिवस आता संपलेत.



जग बदलते तशी पर्यटनाची व्याख्याही बदलत जाते. पूर्वीची संकल्पना अशी होती की पर्यटन हवे पण ते उन्हाळ्यात एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, तर हिवाळ्यात इतर ठिकाणी. पण पावसाळ्यात भ्रमंती मुळीच नको. कारण काय, तर पावसाळ्यात पर्यटनाला निघायचे म्हणजे रेनकोट, रेन चीटर, पावसाळ्यात वापरण्याचे बूट वगैरेंबरोबरच सर्दी-पडसे होईलच असे गृहीत धरून बरोबर न्यावयाची औषधांची बॅग वगैरे नसत्या कटकटी... त्यापेक्षा संपूर्ण पावसाळा शक्यतो घरीच टी.व्ही., सुका मेवा, चहा-कॉफी, भजी-सामोसे यांच्यासह साजरा करणे किती चांगले.

पण मित्रहो, असे केल्याने आपण निसर्गाची केवळ एकच बाजू अनुभवू शकतो. पावसाच्या आगमनाला आसुसलेली ही सृष्टी पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर किती सुंदर आणि मनमोहक रूप धारण करू लागते हे सर्वांना माहीत असतेच. अशावेळी आजूबाजूला अलौकिक आणि अवर्णनीय अशा निसर्गनिर्मितीचा आविष्कार घडत असतो. सृष्टीचे हे देखणे रूप आपल्याला अनुभवायला नको का?



पावसाळ्यात आपल्या येथील कितीतरी पर्यटनस्थळांवरील, समृद्ध पठारांवरील हिरवळीचे गालीचे सुंदर-सुंदर रानफुलांनी मढलेले असतात. एखादे पर्यटनस्थळ उंच ठिकाणी असल्यास तेथील धबधबे आणि त्यांच्या भरभरून वाहणार्‍या आणि कानठळ्या बसवणार्‍या जोरदार प्रवाहाचे दर्शन घडल्यास उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अगदी आपल्या साळावली येथील ठिकाणी पावसाळ्यात तेथील निसर्गसौंदर्यामध्ये भर घालणार्‍या कारंज्यांच्या विरुद्ध बाजूला वाहणार्‍या धरणाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाला पाहून धडकी भरते तशी!



याशिवाय पावसाळ्यात ठिकठिकाणी एखाद्या उंचवट्यावरून नव्याने निर्माण होणारे अनेक छोटे-मोठे झरे वाहत असतात आणि आपल्याला प्रसन्न करीत असतात. याबरोबरच सृष्टीमध्ये एखादे वेळी चालणारा ऊन-पावसाच्या लपंडावाचा खेळ, अधून-मधून आपल्या दृष्टिपथात येणारे इंद्रधनुष्य... हे सारे किती नयनरम्य असते हे वेगळे सांगायची गरज नाही. पावसाळ्यात एखादेवेळी विमानप्रवास घडल्यास केवळ ‘टेक-ऑफ’ आणि ‘लँडिंग’चे क्षण सोडल्यास संपूर्ण प्रवासात आपल्याला ढगांच्या साम्राज्यांतून जाण्याचा, एका वेगळ्याच अनुभवाचा साक्षात्कार घडतो.

 

आपण भारतीय खरोखरच फार नशीबवान आहोत. आपल्या इथे पर्यटनासाठी कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. हिमालयाच्या कुशीतील बर्फाच्छादित शिखरे तेथून दूरच्या स्थानांवरील आपल्यासारख्यांना पर्यटनासाठी खुणावत असतात, तर आपल्या येथील असंख्य समुद्रकिनारे येथील लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात. ज्या स्थळांवरील आपल्या देशबांधवांना समुद्रकिनारे दुर्मीळ असतात त्यांना येथील समुद्रकिनार्‍यांवर आल्यानंतर समोर अथांग सागर बघून केवढा आनंद होत असतो हे आपल्यासारख्या स्थानिकांनी कितीतरी वेळा आपल्या समुद्रकिनार्‍यावरील वाळूत बसून अनुभवले असेलच. म्हणजे, अगदी आपल्याला हिमशिखरे किंवा राजस्थानातील वाळवंटाचे क्षेत्र बघून होतो, तसा आनंद नाही का?


एक मात्र खरे, पावसाळ्यात पर्यटनाला निघायचे झाल्यास आपले प्रवास माध्यम आरक्षित करण्याच्या संदर्भात विशेष अडचण येत नसते. पावसाळ्यात पर्यटक कमी संख्येने येत असतात हे ओळखून निवास सुविधेमध्येही ‘ऑफ-सीझन’ डिस्काउंट्‌स दिले जातात. यातच सारे काही आले.

पावसाळ्यात भ्रमंतीला निघायचे झाल्यास काही गोष्टींचे भान अवश्य राखायला हवे. आपली स्वतःची गाडी घेऊन निघायचे झाल्यास गाडीचे सर्व टायर्स सुस्थितीत पाहिजेतच. गाडीचे संपूर्णपणे चेक-अप किंवा योग्यती दुरुस्ती करून घेऊन गाडीने प्रवास करणे केव्हाही चांगलेच. प्रवासामध्ये छत्री, रेनकोट, पावसाळी बूट यांबरोबरच ‘चार्ज’ करता येण्याजोगी प्रखर विजेरी जवळ असणे जरुरीचे वाटते. आपला प्रवास शक्यतो दिवसाचा असावा, रात्रीचा अजिबातच करू नये. याचे कारण म्हणजे, काही वेळा प्रवासाचा रस्ता आपल्याला परिचित नसतो. त्यातच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्याचा नीट अंदाज बांधणे कठीण होऊन जाते. एखाद्या बस, ट्रक किंवा इतर अवजड वाहनाला वाट करून देताना याचा आपल्याला जास्त त्रास होतो. त्यातच रस्त्यावरील दिवे पेटत नसतील तर विचारूच नका. आपल्या येथे तर ही बाब नित्याचीच असते नाही का? आणि महत्त्वाचे म्हणजे, रात्रीचा एकसारखा प्रवास केल्यास आपल्याला विश्रांती कधी घेता येणार? म्हणूनच काळजी घेणे चांगले.

याशिवाय आपल्या भ्रमंतीमध्ये आणखी काही गोष्टींपासून फार जपले पाहिजे. पावसाळ्यात ठिकठिकाणचे धबधबे, समुद्रकिनारे वगैरे आपल्याला आकर्षित करीत असतात. पर्यटनाविषयक कायद्याच्या मर्यादेत राहून पर्यटनाचा आनंद मिळविल्यास आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना किंवा सहपर्यटकांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे त्रास किंवा मनस्ताप होणार नाही. आपल्या येथे समुद्रात वर्षाकाठी कितीतरी पर्यटक बुडून मृत्यू पावतात. याची प्रमुख कारणे म्हणजे पाण्याचा योग्य अंदाज नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरणे, पोहण्याच्या तंत्रात कमी पडणे आणि तिसरी जीवघेणी ठरणारी गोष्ट म्हणजे दारू पिऊन किंवा अमली पदार्थांचे सेवन करून समुद्रामध्ये उतरणे.

याशिवाय इतर काही गोष्टींचाही खास उल्लेख करावा लागेल, त्यांमध्ये समुद्रात किंवा समुद्रकिनार्‍यावर पाळावयाच्या शिस्तीचा अभाव, आणि हे नियम आणि शिस्त पाळावयाच्या संदर्भात स्थानिक संबंधित यंत्रणेचे योग्य नियंत्रण नसणे, समुद्रकिनार्‍यावर बेकायदेशीर विकली जाणारी दारू किंवा अमली पदार्थ, पर्यटकांच्या गर्दीच्या तुलनेने अगदी कमी संख्येने उपलब्ध किनार्‍यावरील जीवरक्षक वगैरे-वगैरे. त्यामुळे येथील सुंदर किनारे काही वेळा जीवघेणेही ठरू शकतात याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे.



तर मग चला... तयारी करा... या पावसाळ्यातील भ्रमंतीची...

No comments:

Popular Posts