27 April 2008

नेतृत्व कसं हवं?

एखादी संस्था प्रगती करते तेव्हा त्यात तिच्या नेत्याचा सिंहाचा वाटा असतो. खरं तर सर्व कर्मचाऱ्यांचाच वाटा असतो, पण या कर्मचाऱ्यांकडून हवं ते करून घेण्याचं कौशल्य नेत्याचं असतं. काय असतं नेमकं या नेत्याकडे?

चांगल्या नेतृत्वाचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो. पुढे काय होऊ शकेल, याचा आडाखा तो बांधू शकतो. असं नेतृत्व एखाद्या संस्थेत असलं तर त्यामुळे त्या संस्थेपुढे असणाऱ्या आव्हानांचे डोंगर तो लीलया पार करू शकतो.

यशस्वी नेता आपल्या भोवतालच्या लोकांमधलं उपजत ज्ञान आणि गुण ओळखून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देतो. त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करून काम करण्यासाठी अधिकाधिक लोक कसे प्रवृत्त होतील आणि व्यवसायाला चालना मिळेल याकडे तो लक्ष पुरवतो. नेतृत्वगुण अधिक आदर्श होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या या काही गोष्टी-

स्वओळख
प्रथम आपल्यातलेच बरे-वाईट गुण ओळखायला शिकणं. ते गुण ओळखून त्यातल्या चांगल्या गुणांवर भर देत वाईट गुणांवर मात करावी. आपली कार्यशक्ती जोखून त्याप्रमाणे आपली प्रतिमा तयार करावी. प्रतिमा तयार झाली तरी कायम त्यातच अडकून पडू नये. त्यातही एक नेमकी दिशा पकडून त्या दृष्टीनं वाटचाल करायला हवी. इतरांना दिशादर्शन करण्याआधी स्वत:ची योग्य दिशा ठरवायला हवी.

दूरदृष्टी व ध्येयनिश्‍चिती
कामाच्या ठिकाणी नेत्याने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्याचा फायदा पुढे कंपनीलाच होतो. नेत्याने आपल्यापुढे काही ध्येयं निश्‍चित केली, तर त्यातून त्याची दूरदृष्टी दिसून येते. कंपनीला ठोस यश मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठी ध्येयनिश्‍चितीतही वेगवेगळे आडाखे बांधावे लागतात. त्यातले काही पल्ले जवळचे तर काही पल्ले लांबचे असतात.

परिणामकारक सुसंवाद
एक नेता म्हणून तुमच्यावर, तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येयधोरणांवर लोकांनी विश्‍वास ठेवायला हवा. नेत्याचा दृष्टिकोन प्रत्यक्षात यावा हा त्याच्या टीमचाही दृष्टिकोन असायला हवा. त्यासाठी एकमेकांवरचा विश्‍वास, लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची हातोटी नेत्याजवळ असायला हवी. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद राखायला हवा.

मार्गदर्शक
नेतृत्व करणाऱ्याने स्वत: आपल्या कामाच्या बाबतीत सजग राहायला हवे. तो तसा वागला, की आपोआपच इतर सहकारीही कामाची हयगय करीत नाहीत. प्रत्येकाला त्याच्या आवाक्‍यातलं आणि क्षमतेचं काम वाटून दिलं तर काही गोंधळ न उडता ते होऊ शकतं. फक्त "आदेश' सोडून काम होतं असं नाही, तर त्या व्यक्तीला त्या कामात गोडी वाटायला हवी. त्याच्याकडून नेत्याने ते काम करवून घेतलं पाहिजे. प्रसंगी सहकाऱ्यांचं मत आणि विचारही ऐकून घेतले पाहिजेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार केला पाहिजे.

लोकांना त्यांच्या कामात पारंगत करणं आणि त्या कार्यक्षमतेचा योग्य रीतीनं वापर करून घेणं, ही नेत्याची प्राथमिक जबाबदारी मानण्यात येते. अशा वेळी नेत्यानं मार्गदर्शक होऊन काम करून घेतलं पाहिजे.

बदलाचा स्वीकार
बदलत्या काळानुसार नेतृत्वगुणांत होणारे व होऊ घातलेले बदल स्वीकारायला हवेत. बदल हे अपरिहार्य असतात, हे वास्तव स्वीकारायला हवं. जॅक वेल्स यांच्या मते, बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असताना संस्थेतल्या बदलांचा वेग मंदावला असेल, तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असं समजावं. स्थैर्यापेक्षा अस्थिर असतानाच एखादा उद्योग अधिक प्रगती करतो हे ध्यानी ठेवावं. म्हणूनच बदलाचं दडपण किंवा भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणारा आणि सहकाऱ्यांनाही ती सकारात्मकता दाखवणारा नेता होणं गरजेचं आहे.

नेतृत्वगुण
फक्त एमबीएची पदवी घेतली म्हणजे नेतृत्व करता आलं असं नाही, पण त्याचं रीतसर शिक्षण घेतलं तर आपले गुण उंचावायला थोडी मदत होते. शिवाय नेतृत्वगुण नेमके कसे असावेत, व्यवस्थापन कसं करावं, आपलं वागणं-बोलणं कसं असावं आदी गोष्टींचं ज्ञान व्हायला हवं. अशा प्रकारे नेतृत्वगुण अंगी बाणवून कंपनीचं भलं करणाऱ्या नेतृत्वाचीच संस्थांना गरज असते.

- मोनिका दोशी

Popular Posts