27 November 2008

शेअर उत्तम संपत्ती निर्माण करू शकतात

"ज्या वेळी इतर लोक घाबरलेले असतील, त्या वेळी तुम्ही बाजारात प्रवेश करा आणि याउलट ज्या वेळी इतर लोक खरेदीसाठी अधीर असतील त्या वेळी तुम्ही शांत बसा!'' - वॉरेन बफे

मैत्री कोणाशी व्हावी, याला काहीही नियम नसावेत. वय, श्रीमंती, विद्वत्ता, समाजातील स्थान यांसारख्या गोष्टींचा मैत्रीमध्ये अडसर येत नसतो. त्यामुळेच कोणाला कितीही विचित्र वाटले, तरी वॉरेन बफे या अतिश्रीमंत आणि अत्यंत बुद्धिवान माणसाशी मी मैत्री केलेली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये वॉरेन बफे यांचा समावेश होतो. अमेरिकेसारख्या देशातील आर्थिक क्षेत्रात गेली कित्येक दशके हा माणूस स्वतःचे स्थान टिकवून आहे. परंतु, एवढे सारे काही असूनही त्यांचे शेअर बाजाराविषयीचे तत्त्वज्ञान अत्यंत साधे आणि सुलभ आहे आणि त्यामुळेच शेअर बाजाराविषयी मनात काही शंका किंवा संशय निर्माण झाला, की लगेच मी वॉरेन बफेंच्या तत्त्वज्ञानाची मदत घेतो आणि पुढे मार्गस्थ होतो. प्रत्यक्षात एकदाही गाठ न पडतादेखील अनेक गुंतवणूकदार, अभ्यासक आणि विश्‍लेषक यांनी वॉरेन बफेंशी मैत्री केली असणार, यात शंका नाही.

एक अद्‌भुत दुनिया
मुळात शेअर बाजार ही एक अद्‌भुत दुनिया आहे. अनेकांनी इथे कित्येक पैसे मिळवले, तर कित्येकांनी आपली संपत्ती यापायी गमावलीदेखील. एवढे असूनही या अद्‌भुत दुनियेविषयीचे आकर्षण वाढतच आहे. कित्येक जण यात प्रवेश करू इच्छितात. परंतु, वॉरेन बफे स्पष्ट सांगतात, की आधी या बाजाराचा अभ्यास करा, त्याची पूर्ण माहिती करून घ्या आणि मगच त्यामध्ये प्रवेश करा. पुढे जाऊन ते म्हणतात, ""मला ज्या गोष्टीतील कळत नाही, त्यामध्ये मी पैसे गुंतवत नाही.'' डेरिव्हेटिव्ह मार्केट, डे ट्रेडिंग, शॉर्ट सेलमध्ये अनेकांचे पैसे बुडतात, त्या वेळी बफेंचा हा मित्रत्वाचा सल्ला फार उपयोगी ठरू शकतो.

शेअर खरेदी करताना देखील ते म्हणतात, ""ज्या कंपनीच्या उत्पादनातील ज्ञान मला नाही, त्या कंपनीच्या शेअरकडे मी वळत नाही.'' २००० मध्ये जगभर संगणक व्यवसायातील कंपन्याचे शेअर तेजीत होते, त्या वेळी बफे यांनी ठामपणे ते शेअर खरेदी न करण्याचे सूत्र अवलंबले होते. बहुतेकांना वाटले, की त्या वेळी बफे चुकले. परंतु, काही वर्षांतच त्या शेअरचा बुडबुडा फुटला आणि पुन्हा एकदा बफेंचे साधे, सोपे वाटणारे तत्त्वज्ञान लोकांना पटू लागले. या कारणासाठीच अमेरिकेतील शेअर बाजारात ते मायक्रोसॉफ्टच्या (संगणक क्षेत्र) शेअरपेक्षा जिलेटला (घरगुती वापराच्या वस्तू तयार करणारी कंपनी) प्राधान्य देण्याचे धैर्य दाखवतात. त्यांच्या मते, ""भविष्यात लोक संगणक वापरतील की नाही माहीत नाही; परंतु प्रत्येक पुरुष रोज दाढी मात्र नक्कीच करेल !''

संकट नव्हे, संधी!
जागतिक बाजारात सध्या भीतीचे वातावरण दिसत आहे. २००८ या वर्षात जगातील बहुतेक शेअर बाजार प्रचंड कोसळले. भारतीय शेअर बाजारसुद्धा त्याला अपवाद नाही. असे म्हटले जाते, की २००७ या वर्षात बाजारात एवढी तेजी होती, की बाजार बंद असताना लोक अस्वस्थ होत होते. याउलट २००८ या वर्षात बाजारात एवढी भीती आहे, की बाजार चालू असताना लोक अस्वस्थ होत आहेत. कोणीही गुंतवणूक करण्यास पुढे येत नाही. या वेळी वॉरेन बफेंचे प्रसिद्ध वाक्‍य आठवते- ""ज्या वेळी इतर लोक घाबरलेले असतील, त्या वेळी तुम्ही बाजारात प्रवेश करा आणि याउलट ज्या वेळी इतर लोक खरेदीसाठी अधीर असतील त्या वेळी तुम्ही शांत बसा!'' आज पडलेल्या बाजारात कित्येक उत्तम कंपन्यांचे शेअर अत्यंत कमी भावात उपलब्ध आहेत. गरज आहे, ती शांत डोक्‍याने टप्प्याटप्प्याने बाजारात प्रवेश करण्याची. यापुढे जाऊन गुंतवणूकदार विचारतात, की आता प्रवेश करावा हा सल्ला ठीक आहे, परंतु कोणते शेअर घ्यावेत? यावर देखील बफे उत्तर देतात- "आधी कंपनीचा व्यवसाय वाढतो, त्यानंतर त्या कंपनीचा शेअर, बाजारात त्याच पावलावर चालतो.' थोडक्‍यात, ज्या कंपन्यांचे उत्पादन उत्तम आहे, ज्यांच्या उत्पादनावर मंदीचा फारसा परिणाम होणार नाही, ज्या कंपन्यांकडे भविष्यातील खूप ऑर्डर आहेत, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये मंदीच्या काळात अवश्‍य प्रवेश करावा. अर्थात अर्थव्यवस्थेतील तात्पुरत्या हेलकाव्यामुळे असे उत्तम शेअरदेखील पडतात. परंतु, बाजारातील अशा तात्पुरत्या हेलकाव्यांकडे "संकट' म्हणून न पाहता "संधी' म्हणून पाहावे, असे बफे म्हणतात. ज्या माणसाला आपल्या खात्यातील उत्तम शेअरचा बाजारभाव ५० टक्के खाली गेल्याचे बघण्याचे धैर्य नाही, अशा माणसांनी शेअर बाजारात येऊच नये, असा सडेतोड सल्ला ते देतात. कंपनी जर मूलभूतरीत्या भक्कम असेल, तर अशा तत्कालीन वादळांवर मात करून दीर्घ काळात त
शेअर उत्तम संपत्ती निर्माण करू शकतात.

कायमस्वरूपी गुंतवणूक
वॉरेन बफेंच्या मते शेअर बाजार ही "गुंतवणूक' आहे, "सट्टा' नाही. बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी म्हणजे धोका कमी होतो आणि फायदा वाढतो, असे बहुतेक जण सांगतात. परंतु दीर्घकाळ म्हणजे किती यावर बफे म्हणतात- "दीर्घकाळ म्हणजे कायमस्वरूपी!' ज्याप्रमाणे आपण घर, जागा, सोने यामध्ये कायमस्वरूपी गुंतवणूक करतो, त्याप्रमाणेच उत्तम कंपन्यांचे शेअर कायमस्वरूपी ठेवावेत. कारण दीर्घ काळामध्ये आपण "शेअर' खरेदी करत असतो. त्यामुळे दीर्घकाळात ज्या वेळी व्यवसाय वाढतो तेव्हा गुंतवणूकदार हा केवळ "भागधारक' न राहता एका अर्थाने त्या कंपनीच्या "व्यवसायाचा भागीदार' होत असतो.

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी वॉरेन बफे दोन महत्त्वाचे नियम सांगतात, ""नियम पहिला म्हणजे शेअर बाजारात कधीही आपले पूर्ण पैसे गमावू नका आणि नियम दुसरा म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नका!''
अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वॉरेन बफेंचा सल्ला घेण्याचे जाहीरपणे सांगितले आहे. सध्याच्या स्थितीत बफेंची महानता सांगण्यासाठी या गोष्टीपेक्षा आणखी कशाची गरज आहे?

No comments:

Popular Posts