30 June 2012

विटेवरील ‘भाव’दर्शन : पंढरीचा पांडुरंग

महाराष्ट्राच्या जनविश्वाचं अढळ श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग. अलौकिक ज्ञानतत्वाइतकच जनलोकांचे भावविश्व महत्वाचे. कारण , त्या भावविश्वात ते स्वत:ही रमतात आणि ज्ञानरूप परमात्म्यालाही भावरूपात आणून रमवितात. पंढरीच्या विठ्ठलाचे उत्कट भावदर्शन घडते ते लोकवाणीतून. लोकसाहित्य आणि त्यातून प्रकटलेली लोकवाणी म्हणजे जनमानसाचा स्वाभाविक अविष्कार. 


संतवाणीच्या विलक्षण प्रभावाने महाराष्ट्राच्या जनमानसाला विठ्ठल खर्या अर्थाने ज्ञात झाला , तर लोकवाणीच्या प्रभावाने लोकमानसाने तो आपलासा केला. लोकवाणीतील ओव्या , लोकगीते , लोककथा यातून उभे राहिलेले विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर हाच महाराष्ट्राचा खरा लोकदेव आहे आणि मराठी माणसाच्या मनावर शतकानुशतके अधिराज्य गाजवतो आहे हे लक्षात येते. लोकवाणीतील वर्णनात सहजता आहे. स्वाभाविकता आहे. कुठे कृत्रिमता नाही , अभिनिवेश नाही. लोकवाणीला विठ्ठलाचा मोह पडावा आणि अनेक नात्यांनी विठ्ठलाशी जोडत जोडत आठवणी व्हावी हे देखिल स्वाभाविक आहे. विठ्ठल , रूक्मिणी , पंढरपूर , पुंडलिक , भक्तगण , साधुसंत , दिंड्या , पताका , दिंडीखन , गरूडखांब , चंद्रभागेचे वाळवंट , तुळशीची कथा , बुक्याची आवड , रूक्मिणीचं रूसणं , देवाचं हसणं ह्या गोष्टी लोकसाहित्य आणि लोकवाणीतून सहजपणे मांडल्या जातात आणि युगानुयुगे जनमानसात घर करून राहिलेला विठ्ठल भावदर्शनाने अधिक जवळ येतो. 

तो भक्ताशी बोलतो आणि संवाद घडतो. खरंतर पंढरपुरी पांडुरंग आले ते पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेसाठी आणि अठ्ठावीस युगे स्थिरावले ते पुंडलिकाने भिरकावलेल्या प्रेमभावाच्या विटेवर. पांडुरंगाच्या पायाखालची वीट हेच वारकर्यांच्या भक्तिप्रेमाचे अधिष्ठान त्या विटेचं तत्व समजावं म्हणून तत्ववेत्यांची प्रतिभा अखंड शोध घेत राहिली. त्या विटेचं खरं मोठेपण ओळखलं ते एका खेडूत स्त्रीने. ती पंढरपुरला आली. पांडुरंगाच्या राऊळात उभी राहिली आणि पांडुरंगाचं दर्शन घेताना विटेलाच विचारू लागली. 

काय पुण्य केलं पंढरीच्या ग तू इटं (विट)।
देव विठ्ठलाच पाय सापडलं कुठं ?


विठ्ठलाचे चरण लाभावेत म्हणून तत्ववेत्यांनी , ऋषीमुनींनी , तपश्चर्यांनी , उपासकांनी अहोरात्र उपासना करावी ते पाय तुला कुठं सापडले ? तू किती भाग्यवान. विटेचं महत्व ओळखणार्या त्या खेडून स्त्रीला विटेवरचे परब्रह्मही तितक्याच सहजपणे आकळते.


ज्ञानमूर्ती असणारा पांडुरंग भावमूर्ती होऊन लोकवाणीतून प्रगटतो आणि परब्रह्म भावरूप अवस्थेला येऊन लोकमानसाशी बोलू लागते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या नवव्या आश्चर्यात सांगतात ,


आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया।
परमात्मा हा भावाचा पाहुणा आहे. भावाच्या घरी तो आपसूक जातो आणि स्वाभाविक भावदर्शनात प्रेमाने उभा राहतो. खरे तर , भाव हीच भक्तीचीही पूर्णावस्था ठरते.
 

- डॉ. रामचंद्र देखणे

26 June 2012

आता आठ दिवसांत पासपोर्ट!

वेगवान कार्यप्रणालीच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयांनीही कात टाकली असून आता चक्क आठ दिवसांतही पासपोर्ट मिळवणे शक्य झाले आहे. फक्त त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची व फॉर्ममध्ये दिलेल्या अटींची काटेकोरपणे ऑनलाईन पूर्तता पासपोर्ट काढणार्‍या व्यक्तीने करणे अत्यावश्यक आहे.

अन्य कोणतीही अनावश्यक कागदपत्रे जोडू नये, असे आवाहन ठाण्याचे पासपोर्ट अधिकारी टी.डी. शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले. पासपोर्ट कार्यालयांचा वाढता व्याप आणि पासपोर्ट काढणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भातले काम पासपोर्ट व टाटा कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून त्याचे काम सुरूही झाले आहे.

कागदपत्रे योग्य असल्यास व तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी नसल्यास आठ दिवसांत पासपोर्ट उपलब्ध होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. अत्याधुनिक पद्धतीने पूर्वीच्या पासपोर्ट वितरणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आल्याने झटपट पासपोर्ट मिळणे अधिक सोपे झाले आहे. सध्या देशभरात तब्बल ७७ हून अधिक पासपोर्ट केंद्रे उपलब्ध असून त्यामुळे हे शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्ज करा ऑनलाईन
आता पूर्वीप्रमाणे पासपोर्ट कार्यालयात जाऊन फॉर्म आणण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला त्याकरिता ऑनलाईनच अर्ज करावा लागतो. सुमारे पाच पानी ऑनलाईन तपशील भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी तारीख मिळेल. त्यावेळी सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतात.

पोलीस ठाण्याची पद्धती मात्र जुनीच : नव्या प्रणालीमुळे पासपोर्ट मिळणे जलद झाले असले तरीही पोलीस ठाण्याची पद्धत मात्र अद्यापही जुनीच आहे. त्यात जर अत्याधुनिकपणा आला तर पासपोर्ट मिळणे अधिक जलद गतीने सुखकर होईल, असेही मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

16 June 2012

एज्युकेशन लोन.? कुणी ? का? कधी घ्यावं.?

एज्युकेशन लोन. म्हणजेच शैक्षणिक कर्ज. याविषयी आपल्याकडे बरेच समज-गैरसमज आहेत. ते कुणी घ्यावं, कुणाकडून घ्यावं याबाबत मुलं-मुलीच नाही तर पालकही खूप अनभिज्ञ दिसतात. शिकताना आपल्या मुलाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नको, असं वाटल्यानं अनेक पालक स्वत:चं सोनं विकतात, गहाण टाकतात पण शैक्षणिक कर्ज घेत नाहीत.

कितपत करणं योग्य असतं हे सारं.?

विशेषत: मेडिकल, इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि अन्य उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना जर त्या शिक्षणाच्या फी साठी कर्ज उपलब्ध आहेत तर ती का घेऊ नये.?

ती फेडताना पालकांच्या नाकीनव येतात का.?

तर अजिबात नाही.

उलट बदलत्या काळात शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार मुलांनीच करायला हवा आणि त्याबाबतची सर्व माहिती करून घेऊन आपल्या शिक्षणाचा भार आपणच उचलायला हवा.

जर आपण एरवी सर्व बाबतीस स्वतंत्र आणि आधुनिक विचारांचे असतो तर मग आपण आपल्या शिक्षणाचा भार स्वत:च का उचलू नये. वडिलांकडे पैसे नाहीत या एका सबबीखाली शिक्षण थांबवायचं आणि आपण पुढं शिकू शकलो नाही याचा दोष आईवडिलांना किंवा परिस्थितीला द्यायचा हे काही योग्य नव्हे.

मुख्य म्हणजे पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबवावं किंवा सावकाराकडून अव्वाचे सव्वा व्याज देऊन पैसे घ्यावेत, असं करण्यापेक्षा शैक्षणिक कर्जाचा मार्ग निवडलेला बरा. शैक्षणिक कर्ज स्वस्त असतं हे लक्षात ठेवा.

त्यासाठी संपूर्ण माहिती करून घ्यावी. आणि निर्धास्त मनानं अभ्यासाला लागावं.

शैक्षणिक कर्ज कुणाला मिळतं.?

उच्चशिक्षण घेणार्‍या कुणाही विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळतं. ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल त्या अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीची फी म्हणून हे कर्ज मिळतं. दोन किंवा तीन वर्षांंंचा अभ्यासक्रम असेल तर प्रत्येक वर्षीच्या फी चा धनादेश वेगळा मिळतो.

धनादेश कुणाच्या नावे मिळतो?

धनादेश तुम्ही ज्या संस्थेत अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या संस्थेच्या नावे मिळतो.

कर्जाच्या रकमेत कुठल्या फी चा समावेश असतो.?

या रकमेत केवळ अभ्याक्रमाच्या शैक्षणिक फी चा समावेश असतो. डोनेशनचा नाही. ज्या आणि जेवढय़ा रकमेची पावती ती संस्था देते तेवढेच कर्ज मिळू शकते. त्यामुळे संस्थेकडे पावतीचा आणि योग्य फी घेण्याचा आग्रह तुम्हालाच धरावा लागतो. डोनेशन किंवा अँडमिशन करण्यासाठी जे अधिकचे पैसे संस्था घेतात त्यासाठी कर्ज दिले जात नाही.

फी वाढल्यास कर्जाच्या रकमेत वाढ होते का.?

होते. मात्र फी वाढ झाल्याचे पत्र तुम्हाला बँकेत जमा करावे लागते.

शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँक कशी निवडावी.?
 क्यतो सरकारी बँकांची निवड करा. प्रत्येक बँकेत व्याजदर बहुतांश समान असतो. मात्र तरीही एकदा खात्री करून घ्या. इतर कर्जांच्या तुलनेत शैक्षणिक कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे बँक निवडताना भरवशाचीच बँक निवडा.


कर्जफेडीला सुरुवात कधी होते.?

नाही फेडले तर शिक्षण मध्ये थांबू शकते का.?

नाही. शिक्षण मध्ये थांबू शकत नाही. मात्र ठरलेले व्याज तुम्ही दरमहा भरणं उत्तम. कर्जफेडीला सुरुवात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वर्षभरानं प्रत्यक्षात कर्जफेडीला सुरुवात होते. अपेक्षा अशी की तोपर्यंत कर्ज घेणारा आपल्या पायावर उभा राहून कर्ज फेडू शकेल. शिक्षण सुरू असताना कर्जफेडीसाठी कुणीही तगादा लावत नाही.

नापास झालो तर..?

शेवटच्या वर्षाला नापास झाला तरी एका वर्षाचा अवधी मिळतो. पण मध्येच नापास झाला तर पुढील शिक्षणाची फी पुढच्या वर्गात गेल्यावरच मिळते. पण कर्ज काढून शिकताना नापास न होणंच उत्तम. आणि श्रेयस्कर.

कर्ज घेण्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात.?

१) प्रवेश घेत असल्याचे आणि त्यासाठी अमुक फी हवी, असं सांगणारे संस्थेचे पत्र.
२) आधीच्या वर्षाची गुणपत्रिका.
३) निवासाचा पुरावा.
४) आई आणि वडील यांची गॅरेण्टर म्हणून सही. अन्य नातेवाईक भाऊ-बहीण-काका-मामा-मावशीही चालेल.
५) त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा.
उत्पन्न करात सूट.?

पालकांना या कर्जापोटी उत्पन्न करात सूट मिळू शकते.

Popular Posts