30 June 2012

विटेवरील ‘भाव’दर्शन : पंढरीचा पांडुरंग

महाराष्ट्राच्या जनविश्वाचं अढळ श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग. अलौकिक ज्ञानतत्वाइतकच जनलोकांचे भावविश्व महत्वाचे. कारण , त्या भावविश्वात ते स्वत:ही रमतात आणि ज्ञानरूप परमात्म्यालाही भावरूपात आणून रमवितात. पंढरीच्या विठ्ठलाचे उत्कट भावदर्शन घडते ते लोकवाणीतून. लोकसाहित्य आणि त्यातून प्रकटलेली लोकवाणी म्हणजे जनमानसाचा स्वाभाविक अविष्कार. 


संतवाणीच्या विलक्षण प्रभावाने महाराष्ट्राच्या जनमानसाला विठ्ठल खर्या अर्थाने ज्ञात झाला , तर लोकवाणीच्या प्रभावाने लोकमानसाने तो आपलासा केला. लोकवाणीतील ओव्या , लोकगीते , लोककथा यातून उभे राहिलेले विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर हाच महाराष्ट्राचा खरा लोकदेव आहे आणि मराठी माणसाच्या मनावर शतकानुशतके अधिराज्य गाजवतो आहे हे लक्षात येते. लोकवाणीतील वर्णनात सहजता आहे. स्वाभाविकता आहे. कुठे कृत्रिमता नाही , अभिनिवेश नाही. लोकवाणीला विठ्ठलाचा मोह पडावा आणि अनेक नात्यांनी विठ्ठलाशी जोडत जोडत आठवणी व्हावी हे देखिल स्वाभाविक आहे. विठ्ठल , रूक्मिणी , पंढरपूर , पुंडलिक , भक्तगण , साधुसंत , दिंड्या , पताका , दिंडीखन , गरूडखांब , चंद्रभागेचे वाळवंट , तुळशीची कथा , बुक्याची आवड , रूक्मिणीचं रूसणं , देवाचं हसणं ह्या गोष्टी लोकसाहित्य आणि लोकवाणीतून सहजपणे मांडल्या जातात आणि युगानुयुगे जनमानसात घर करून राहिलेला विठ्ठल भावदर्शनाने अधिक जवळ येतो. 

तो भक्ताशी बोलतो आणि संवाद घडतो. खरंतर पंढरपुरी पांडुरंग आले ते पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेसाठी आणि अठ्ठावीस युगे स्थिरावले ते पुंडलिकाने भिरकावलेल्या प्रेमभावाच्या विटेवर. पांडुरंगाच्या पायाखालची वीट हेच वारकर्यांच्या भक्तिप्रेमाचे अधिष्ठान त्या विटेचं तत्व समजावं म्हणून तत्ववेत्यांची प्रतिभा अखंड शोध घेत राहिली. त्या विटेचं खरं मोठेपण ओळखलं ते एका खेडूत स्त्रीने. ती पंढरपुरला आली. पांडुरंगाच्या राऊळात उभी राहिली आणि पांडुरंगाचं दर्शन घेताना विटेलाच विचारू लागली. 

काय पुण्य केलं पंढरीच्या ग तू इटं (विट)।
देव विठ्ठलाच पाय सापडलं कुठं ?


विठ्ठलाचे चरण लाभावेत म्हणून तत्ववेत्यांनी , ऋषीमुनींनी , तपश्चर्यांनी , उपासकांनी अहोरात्र उपासना करावी ते पाय तुला कुठं सापडले ? तू किती भाग्यवान. विटेचं महत्व ओळखणार्या त्या खेडून स्त्रीला विटेवरचे परब्रह्मही तितक्याच सहजपणे आकळते.


ज्ञानमूर्ती असणारा पांडुरंग भावमूर्ती होऊन लोकवाणीतून प्रगटतो आणि परब्रह्म भावरूप अवस्थेला येऊन लोकमानसाशी बोलू लागते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या नवव्या आश्चर्यात सांगतात ,


आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया।
परमात्मा हा भावाचा पाहुणा आहे. भावाच्या घरी तो आपसूक जातो आणि स्वाभाविक भावदर्शनात प्रेमाने उभा राहतो. खरे तर , भाव हीच भक्तीचीही पूर्णावस्था ठरते.
 

- डॉ. रामचंद्र देखणे

No comments:

Popular Posts