30 October 2008

"युलिप'चे काय कराल?

फक्त तीन वर्षे पैसे भरले की झाले, या समजुतीने जर कोणी युलिप पॉलिसी घेतली असेल व तसेच करण्याचा त्यांचा विचार असेल, तर ते चुकीचे ठरू शकेल. तीन वर्षे पूर्ण झाली असली किंवा नसली, तरी पुढचे हप्ते भरणे थांबवू नये. जेवढ्या मुदतीची पॉलिसी असेल, तितकी वर्षे हप्ते भरणे शहाणपणाचे ठरेल. तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जर कोणी हप्ते भरणे थांबवले असेल, तर त्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे उत्तम.
आयुर्विमा ही गुंतवणूक समजणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांना विमा क्षेत्राच्या खासगीकरणानंतर "युलिप' ही म्युच्युअल फंडाप्रमाणेच शेअर अथवा रोखे बाजारातील गुंतवणुकीशी निगडित विमा पॉलिसी उपलब्ध झाली आणि मरगळलेल्या विमा क्षेत्राला जणू नवसंजीवनीच प्राप्त झाली. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या खासगी कंपन्या, त्यांचे विक्री अधिकारी, विमा प्रतिनिधी, वाढत गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक, लॅपटॉपवर तयार केलेले कागदी घोडे आणि विमा घेणाऱ्यांचा त्यावर बसलेला विश्‍वास, या सर्वांमुळे या प्रकारची पॉलिसी अल्पावधीत लोकप्रिय झाली नसती तर ते एक आश्‍चर्यच ठरले असते; पण आज जेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक झपाट्याने नऊ हजारांखाली घसरला आहे, तेव्हा मात्र या पॉलिसीसंबंधी नव्याने विचार करणे आवश्‍यक ठरते. फक्त तीन वर्षे पैसे भरले की झाले, या समजुतीने जर कोणी ही पॉलिसी घेतली असेल व तसेच करण्याचा त्यांचा विचार असेल तर ते चुकीचे ठरू शकेल.
सध्या शेअर बाजाराचा निर्देशांक खाली आल्यामुळे बहुतेक "युलिप' योजनांच्या किमतीसुद्धा उतरल्या आहेत. ज्यांनी या प्रकारची पॉलिसी कोणत्याही खासगी अथवा सरकारी कंपनीकडून घेतली असेल, त्यांनी पुढे दिलेल्या सूचना पाळल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकेल.
१) तीन वर्षे पूर्ण झाली असली किंवा नसली, तरी पुढचे हप्ते भरणे थांबवू नका. जेवढ्या मुदतीची पॉलिसी असेल, तितकी वर्षे हप्ते भरणे शहाणपणाचे ठरेल. तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जर कोणी हप्ते भरणे थांबवले असेल, तर त्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे उत्तम. काही वेळा नवीन पॉलिसी घेण्यास सांगितले जाते; पण तसे न करता असलेल्या आधीची पॉलिसीच पुन्हा सुरू करा. कारण नवीन पॉलिसी घेतल्यास पुन्हा पहिल्या वर्षी भरमसाट शुल्क भरावे लागेल.
२) जर आपला एकूण वार्षिक हप्ता पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर जितके जास्त पैसे "टॉपअप' पद्धतीने भरणे शक्‍य असेल व कंपनीच्या नियमात बसत असेल तेवढे भरावेत. कारण या पॉलिसीमध्ये आस्थापना शुल्क दर महिन्याला युनिट्‌सच्या रूपात कापून घेतले जाते, ते टक्केवारी पद्धतीने नसून त्याची रक्कम निश्‍चित असते. त्यामुळे आपल्याला भराव्या लागणाऱ्या शुल्काची टक्केवारी कमी होईल व भविष्यात होणारा फायदा चांगला असू शकेल. उदा. समजा आपल्या युलिपची फंड व्हॅल्यू रु. १२००० आहे. आपला हप्ता रु. १०००० प्रतिवर्ष असेल आणि पॉलिसीची एनएव्ही रु. १२ प्रति युनिट आहे आणि आस्थापना शुल्क रु. ५० प्रतिमाह असेल तर पुढे दिल्याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

आस्थापना शुल्क (युनिट्‌सच्या रूपात) = आस्थापना शुल्क एनएव्ही
तक्ता क्रमांक १ (टॉपअप न करता)
तारीख-एनएव्ही-युनिट्‌सची संख्या-फंड व्हॅल्यू-आस्थापना शुल्क युनिट्‌सच्या रूपात
१ ऑगस्ट ८-१२-१०००-१२०००-४.१७
१ सप्टेंबर ८-११-९९५.८३-१०९५४.१३-४.५४
१ ऑक्‍टोबर ८-१०-९९१.२९-९९१२.९-५

तक्ता क्रमांक २ - टॉपअप केल्यास
तारीख-एनएव्ही-युनिट्‌सची संख्या-फंड व्हॅल्यू-आस्थापना शुल्क युनिट्‌सच्या रूपात- टॉअप रक्कम
१ ऑगस्ट ८-१२-१०००-१२०००-४.१७-
१५ ऑगस्ट ८-११.५-४३४.७८- - -५०००
१ सप्टेंबर ८-११-१४३०.६१-१५७३६.७१-४.५४-
१ ऑक्‍टोबर ८-१०-१४२६.०९-१४२६०.९-५-
---------------
दोन्ही तक्‍त्यांचा अभ्यास केल्यास हे दिसून येईल, की आस्थापना शुल्काच्या रूपाने दोन्ही परिस्थितीमध्ये ४.५४ व ५ युनिट्‌सच कापले गेले आहेत. जर पंधरा अथवा वीस वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीमध्ये या पद्धतीने टॉपअप करत राहिल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
३) जर कोणत्याही कारणाने पॉलिसीची मुदत संपेपर्यंत हप्ते भरणे शक्‍य नसेल, तर कंपनीच्या नियमाप्रमाणे आपली असलेली फंड व्हॅल्यू काढून घ्या. पुढील हप्ते न भरता फंड व्हॅल्यू तशीच राहू दिल्यास एखादेवेळी तुमच्या पॉलिसीची व्हॅल्यू शून्यसुद्धा होऊ शकेल. कारण विमा कंपनी आकारत असलेले आस्थापना शुल्क, विमा शुल्क, फंड व्यवस्थापन शुल्क तुम्ही पुढचे हप्ते भरले नाहीत, तरी तुमच्या फंड व्हॅल्यूमधून वसूल केले जातच राहणार; पण फंड व्हॅल्यू काढून घेतल्याने तुमचे विमासंरक्षण संपणार आहे हे लक्षात ठेवा व त्याची भरपाई नवीन विमा पॉलिसी (टर्म/ एंडोमेंट) घेऊन करण्याचा प्रयत्न करा.
४) नवीन युलिप घेताना कंपनी आकारणार असलेल्या सर्व शुल्काची व आकारण्याच्या पद्धतीची आणि मिळणाऱ्या विमा संरक्षणाची माहिती करून घ्या.
५) करनियोजनासाठी "युलिप'पेक्षा "सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन'द्वारे (एसआयपी) म्युच्युअल फंड गुंतवणूक सयुक्तिक ठरते, कारण एकदा युलिप घेतली, की ती उत्तम परतावा देवो अथवा न देवो कमीत कमी तीन वर्षे हप्ते भरणे आवश्‍यक असते; पण जर एखाद्या म्युच्युअल फंडाने चांगला परतावा दिला नाही, तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या फंडात गुंतवणूक करता येते.
शेअर बाजारात तेजी-मंदीच्या लाटा येतच असतात. आज खाली गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक भविष्यात परत वर जाणार आहेच. त्यामुळे वरील विवेचनाचा उपयोग करून आपापले "युलिप नियोजन' करता येऊ शकेल.

विक्रम देशमुख

Popular Posts