03 November 2009

खंजीर का खुपसला? : शिवसेनेवर नाराज मराठी तरुणांची प्रतिक्रिया

मराठी माणसानेच शेवटी पाठीत खंजीर खुपसल्याचा निष्कर्ष ‘सामना’मधून काढण्यात आल्यामुळे लालबाग, परळ येथीलच नव्हे तर जोगेश्वरी पूर्व पासून ते भांडूपपर्यंत अनेक मराठी तरुण सध्या शिवसेनेवर नाराज आहेत. खंजीर पाठीत नाही पोटात खुपसल्याची उघड प्रतिक्रिया अनेक तरुणांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली. मुळात लालबाग-परळसारख्या कट्टर मराठी विभागांमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहताना आणि त्यात अमराठी श्रीमंत राहायला येताना शिवसेनेचे आमदार काय करीत होते, असा सवालही अनेक तरुण करू लागले आहेत.
लालबाग-परळ म्हणजे मराठी माणूस असे समीकरण गेली अनेक वर्षे मुंबईकरांच्या मनात पक्के बसले आहे. माटुंगा दाक्षिणात्यांचा, घाटकोपर गुजरात्यांचा तसे लालबाग-परळ मराठी माणसाचे हे ठरून गेलेले होते. ‘लाडू सम्राट’चा वडा, ‘क्षीरसागर’मधील कोंबडी वडे, ‘गुरुकृपा’मधील कपडे, ‘गौरीशंकर छित्तरमल’ची मिठाई हे मुंबईतीलच नाही तर पार अगदी बांद्यापर्यंतच्या कोकणी माणसाच्याही सांस्कृतिक आयुष्याचा अविभाज्य भाग होते. मात्र गेल्या पाच-सात वर्षांमध्ये लालबाग-परळमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहायला लागले. मराठी माणसांच्या खुरटय़ा चाळींच्या पहिल्या मजल्यावर पंप लावल्याशिवाय पाणी चढत नसताना या टॉवरमधील स्वीमिंगपूलने सुरुवातीला मराठी माणसाचे डोळे दिपून गेले तरीही यात आपला वाटा काहीच नाही, हे समजल्यावर त्याच्या डोक्यात तिडीक गेल्याचे बाळा उतेकर या परळमधील रहिवाशाने सांगितले. उच्च मध्यमवर्गीय अमराठी लोकांमुळे जीवनावश्यक वस्तुंचे भावही पूर्वीपेक्षा महाग झाले. भाज्या महागल्या आणि शाकाहारी अमराठींनी अनेक ठिकाणी मासळीबाजार उठविण्याच्या क्लृप्त्या सुरू केल्या. मात्र या कशाकडेही सेनेच्या नेतृत्वाने लक्ष न दिल्याची तक्रार आज येथील रहिवाशी करीत आहेत.
परळ येथील सिग्रेट फॅक्टरीचा एस. टी. थांबाही आयटीसीच्या पंचतारांकित सजावटीवर डाग वाटत असल्यामुळे हटविण्यात आला. कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी व गावाकडच्या नव्या मंडळींसाठी परळचा हा थांबा म्हणजे मोठा ‘माईलस्टोन’ होता. विठ्ठल चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा थांबा हलविल्यावरही शिवसेनेने हूं का चूं केले नाही.
ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मुंबईतील चमक-धमक दिवसागणिक वाढत असताना मराठी माणसाचे मासिक उत्पन्न मात्र ४०००च्याच घरात राहिल्याने सामान्य मराठी माणसांची प्रत्येक गोष्टीत कुचंबणा होत होती. महागाईच्या फटक्याने कातावलेल्या मराठी माणसाला विरोधी पक्षही महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करताना दिसत नव्हता, त्यामुळेच मराठी माणसाने शिवसेनेऐवजी मनसेचा पर्याय निवडल्याची प्रतिक्रिया प्रकाश आचरेकर या परळ येथील रहिवाशाने व्यक्त केली.
 गिरणगावातून आज शिवसेनेच्या विरोधात उघड उघड राग व्यक्त होत असतानाच ‘सामना’मधून करण्यात आलेले मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसल्याचे विश्लेषण मराठी माणसांच्या मनाला प्रचंड लागले आहे. मराठी माणूस हलाखीत जगत असताना मराठी माणसांच्या नावे गळे काढणाऱ्या आमदारांच्या दरवाजात गाडय़ा उभ्या करण्यास जागा नाही, अशी परिस्थिती असेल तर हा खंजीर पाठीत नाही तर उघड उघड पोटात खुपसला आहे, असेच मराठी विभागांमध्ये स्पष्ट बोलले जात आहे

श्रीकांत जोशी
९८२११८८०२८
 

No comments:

Popular Posts