27 November 2007

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

03 September 2007

शापित वाटा—–(गझल)

सत्य विखुरले इथे असत्य एकसंध हे
पुष्प फ़क्त देखणे कटकांना गंध हे ।

व्यर्थतेत मोडतो उठाव दुर्जनांपुढे
उठाव मातीमोल अन ’गोळे’ मुर्तिमंत हे ।

अमर्याद वाढली बांडगुळी पाळॆमुळॆ
परोपकार मुक मात्र स्वार्थगान बुलंद हे ।

उंच उंच इमल्यांची चमचमती माणसे
दुर्लक्षित राहुट्या , ’चमचमते’ अंध हे ।

को-या धरतीवरुनी सरती नभे पुढे
को-या डोळ्यात मात्र पर्जन्य ज्वलंत हे ।

दंभाचा चमत्कार ,दुनियेचि लोळणे
पुज्यांना हिणवुनी भस्माळलेले वंदय हे ।

डुंबुनी गंगेतिरी पापखाते झडती नवी
ज्योत भडकल्या मात्र मंद यद्न्यकुंड हे ।

मुढांना आत्मविश्वास बुद्धीवान साशंक हे
संकुचित धनाढ्य मात्र दयाळु इथे रंक हे ।

कशा फ़ुका उडविता धुराळॆ एकिची
सौजन्य दावणी ,अन तंटे बेबंद हे ।

-प्राजक्त

04 May 2007

अचूक निर्णय कसा घ्यावा?

योग्य वेळी योग्य निर्णय
योग्य वेळी योग्य निर्णय घेणे तशी अवघड गोष्ट आहे. जीवनात काही निर्णय घेण्यामुळे आयुष्याची दिशा ठरणार असते. त्यामुळे सर्वांगीण विचार करणे महत्त्वाचे ठरते. निर्णयप्रक्रियेच्या दृष्टीने उपलब्ध माहिती, आपल्याला आलेले अनुभव, आपला आत्मविश्‍वास, सकारात्मकता, जोखीम घेण्याची तयारी हे घटक महत्त्वाचे आहेत.

पर्यांयातून निवड
बहुतेक वेळा एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा निर्णय घेणे तुलनेने सोपे जाते; पण ज्या प्रसंगी फक्त दोनच पर्याय उपलब्ध असतात तेव्हा कमीत कमी हानी व जास्तीत जास्त फायदा होणारा पर्याय निवडणे चांगलेच असते; पण आपली कुवत लक्षात न घेता इतरांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय नेहमी यो१/२य ठरतातच असे नाही. कोणताही निर्णय घेताना आपल्या व्यक्तित्वातील गुणावगुणांचा अभ्यास व विश्‍लेषण करून सकारात्मक वैशिष्ट्याचे मूल्य ठरवावे. आपली कार्यक्षमता किती टिकू शकते, याचा नीट विचार करावा व त्यानुसार निर्णय घ्यावा. यानुसार आशिषने धडाडीने सुरू केलेला रेडिमेड कपड्यांचा बिझनेस चालू ठेवण्यासाठी (ब) पर्याय निवडला तर निर्णय घेण्याचे फारसे दडपण त्याच्यावर येणार नाही.

निर्णयाची जबाबदारी
बऱ्याचदा आपणाला दिसते, की काही व्यक्ती निर्णय घेण्याचे टाळतात किंवा चुकीचा निर्णय घेऊन नंतर पस्तावतात. कारण मुळात अंतःप्रेरणा नसेल, नवीन बदलाची भीती वाटत असेल, वस्तुनिष्ठ विचार न करता भावनिकता जास्त असेल तर निर्णयाची जबाबदारी व जोखीम स्वीकारण्याची तयारी नसते.

व्यावहारिक शहाणपण
योग्य निर्णय घेता येण्यासाठी कॉमन सेन्स असणे आवश्‍यक ठरते. नोकरी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेत असताना व्यावहारिक पातळीवरून विचार करण्याची क्षमता व त्यानुसार निर्णय अमलात आणण्याचे धैर्य व चिकाटी असणे म्हणजेच कॉमन सेन्स (व्यावहारिक शहाणपण) होय.

कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यासंदर्भातील भविष्यातील घटनांचे पूर्वकथन, आपल्याला घ्यावी लागणारी जोखीम व त्या निर्णयामुळे होणारा फायदा यांचा सर्वांगीण विचार करता येणे "करियर व कुटुंब' यांचा तोल सांभाळण्यासाठी आवश्‍यक असते. यानुसार (ब) हा पर्याय दीपासाठी योग्य ठरतो.
थोडक्‍यात, कोणताही निर्णय घेताना जीवनात सुस्पष्ट व ठाम विचार, उद्दिष्टांची स्पष्ट जाणीव व क्रमवार मांडणी घेतलेल्या निर्णयानुसार ठाम वर्तन करण्याची मानसिक सिद्धता असेल तर द्विधा मनःस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, हे निश्‍चित!

निर्णय घेण्यासाठी आवश्‍यक -
- सुस्पष्ट व ठाम विचार
- आपल्या उद्दिष्टांची क्रमवार मांडणी
- व्यावहारिक शहाणपण
- भविष्यातील घटनांच्या पूर्वकथनांचा फायदा
- हिंमत व धमक

(प्रा. सुषमा भोसले)

27 April 2007

तो आहेच मुळात असा

तो मुळातच वेडा..
अश्रुदेखील शरीराचा भाग म्हणुन जपणारा
मी मात्र अगदी चंचल..
अश्रुदेखील सांडतांना, खळखळुन हसणारी
तो नुसताच कवी..
आभाळ जरी भरून आल तरी त्यावर कविता करणारा
मी मात्र शब्दवेडी..
एक एक ओळ रचतांना, यमकांच भान जपणारी
तो अगदीच भावुक..
सुर्यालाही - चंद्रालाही एकाच नजरेने बघणारा
मी मात्र वेगळीच..
मला ऊन नको, फक्त सावलीतच फिरणारी
पण त्याची कविता वेगळीच,
त्याचा अर्थही वेगळा..
एकेका शब्दात भरलेला असतो चंद्रचींब मारवा
माझी कविता एक्कलकोंडी
फक्त मनमोकळ हसणारी
माझ मलाच कळत नाही, का स्वतःतच फसणारी ?
तो आहेच मुळात असा
अगदी वेड्यासारखा वागणारा
अश्रुदेखील शरीराचा एक
भाग म्हणुन जपणारा..

आणी मी मात्र अशी
शब्दांतच गुरफटलेली
यमक जुळवत असतांना
कविताच कुठेतरी चुकलेली ..

अमॄता__

02 January 2007

नवं वर्ष सुरु झालं

नवं वर्ष सुरु झालं आणि
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी
म्हणजे १ जानेवारीला
त्यानं एक कोरं चेकबुक माझ्या हातात ठेवलं
त्याच्या banket माझं तहहयात खातं आहे
खातं म्हणजे साधं बचत खातं नव्हे
तर फ़िक्स्ड deposit !

दरवर्षी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी
तो एक जाडजूड चेकबुक
माझ्या हवाली करतो
वर्षभर वापरण्याकरिता !

खरं सांगू का….
केवळ माझंच नव्हे तर अगदी प्रत्येकाचं
त्याच्या banket फ़िक्स्ड deposit आहे.
पण आपल्यापैकी बरेचजण
त्याविषयी अनभिज्ञ असतात

नव्या वर्षाच्या आरंभी
प्रत्येकाला तो हे जाडजूड चेकबुक देत असतो.
त्या चेकबुकात ३६५ चेक असतात.
प्रत्येक दिवसाचा एक चेक !
प्रत्येक चेकवर रक्कम टाकलेली असते,
२४ तास किंवा १४४० मिनिटे,
किंवा ८६४००० सेकंद…!

काही व्यक्तींना त्याचं मोल कळतं
ते हा चेक काळाच्या banket वठवतात
आणि त्यावर टाकलेल्या रकमेत
प्रत्येक तास, प्रत्येक मिनिटं, प्रत्येक सेकंद
सत्कारणी लावतात.
हि रक्कम वापरून आयुष्य फ़ुलवतात, सजवतात!

काही व्यक्तींना त्याची जाणीव असते
पण त्याचं मोल कळत नाही.
ते या चेकवरील रक्कम नुसती टाईमपास साठी वापरतात.
ते आयुष्य साजरं वगैरे करत नाहीत.
आयुष्य ढकलतात, दिवस घालवतात !

काही व्यक्तींना मात्र याचि जाणीवही नसते.
मग मोल वगैरे कळण्याचा प्रश्नच नाही.
त्यांच्या चेकबुकातले चेक दररोज जीर्ण होऊन गळून पडतात.
गतकाळाच्या डस्टबिनमधे जमा होतात.

तो पुढच्या वर्षी पुन्हा ईमानेइतबारे
नवं चेकबुक त्यांच्या हातात ठेवतो.
पण पुन्हा तेचं….!
अशा माणसांच आयुष्य अतिशय
नीरस, कंटाळवाणं आणि दु:खी असतं…!


By The Way…आपण यातल्या कोणत्या categoryमधे येता बरं…!

Popular Posts