- आपल्या मनोवृत्तीचा बारकाईने विचार करा. कोणकोणत्या दृष्टीने या मनोवृत्तीत बदल घडवायचा आहे, याचा एक आराखडा तयार करा व क्रमाक्रमाने आपल्या मनोवृत्तीत बदल करण्याचा प्रयत्न करा. असे करणे निश्चितच कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही.
- आपल्या मित्रमंडळात बदल करा. असे मित्र निवडा, ज्यांच्या कुटुंबात व्यवसायाचे वातावरण आहे. फावल्या वेळात व्यवसाय कसा केला जातो, त्यातील बारकावे कोणते, यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुमच्यातील जिज्ञासा, कुतूहल, उत्साह पाहून त्यांनाही तुम्हाला प्राथमिक धडे देणे आवडेल.
- आपल्या वाचनात बदल करा. ललित साहित्य वाचण्यापेक्षा व्यावसायिकांची चरित्रे, व्यावसायिक वर्तमानपत्रे, व्यावसायिक मासिके यांच्याकडे जास्त लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला त्यात रस निर्माण होईल व व्यवसायातील बारकावे लक्षात येतील.
- आपले सर्वसामान्य शिक्षण चालूच ठेवा; पण त्याचबरोबर व्यवसायाचे वेगवेगळे अभ्यासक्रम कोणते, याचाही शोध घ्या व फावल्या वेळेत तेही पूर्ण करा. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र बनेल.
- दिवाळीच्या सुटीत, उन्हाळ्याच्या सुटीत, वीक एंडला छोटे-मोठे व्यवसाय करावयास सुरवात करा. त्यातून मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नाची चटक लागली, की ते वाढविण्याचा प्रयत्न करा. कदाचित, तेच व्यवसाय तुमच्या भविष्यातील उपजीविकेचे साधन बनतील.
- भरपूर प्रवास करा, जग बघा, जगण्याच्या नवनवीन पद्धती आत्मसात करा, ठिकठिकाणी व्यवसाय पद्धती कशा चालतात, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करा. इतर प्रदेशांतील विविध वस्तू आपल्या गावी आणून त्यांना बाजारपेठ मिळू शकेल काय, याचा अभ्यास करा व त्यातून किती लाभ मिळू शकेल, याचा अंदाज घ्या.
- गावोगाव मोठमोठी व्यावसायिक प्रदर्शने भरतात. त्या प्रदर्शनांना अवश्य भेटी देत राहा. त्यातून व्यवसाय क्षेत्रात कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, याबद्दल निश्चितच अधिक ज्ञान मिळेल.
- मोठमोठ्या व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्या. त्यांच्याकडून यशस्वी व्यवसायाबद्दल टिप्स घेत राहा. त्यांच्याकडून व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबद्दल व संकटांबद्दल जाणून घ्या व त्या त्यांनी कशा टाळल्या, याबद्दल त्यांचे विचार संग्रही करा.
- व्यवसायसंवर्धनासाठी सरकारने विविध संस्था स्थापन केल्या आहेत. अशा संस्थांना भेटी, तिथे उपलब्ध असलेले लिखित साहित्य मिळवा व त्याचे सखोल वाचन करा.
- नाटकात एखादा नट एखाद्या पात्राचे काम करतो त्या वेळी तो त्या पात्राशी एकरूप होतो. तो जर पूर्णपणे एकरूप होऊ शकला तरच तो कसलेला नट बनतो. तसाच "मी व्यावसायिक बनणार', हा ध्यास मनाला लागू द्या. तो लागला तर आपल्या चालण्यात, बोलण्यात, विचारांत, कृतीत, वागणुकीत आपोआपच बदल जाणवायला लागेल व आपल्या मानसिकतेत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.