27 November 2007

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

03 September 2007

शापित वाटा—–(गझल)

सत्य विखुरले इथे असत्य एकसंध हे
पुष्प फ़क्त देखणे कटकांना गंध हे ।

व्यर्थतेत मोडतो उठाव दुर्जनांपुढे
उठाव मातीमोल अन ’गोळे’ मुर्तिमंत हे ।

अमर्याद वाढली बांडगुळी पाळॆमुळॆ
परोपकार मुक मात्र स्वार्थगान बुलंद हे ।

उंच उंच इमल्यांची चमचमती माणसे
दुर्लक्षित राहुट्या , ’चमचमते’ अंध हे ।

को-या धरतीवरुनी सरती नभे पुढे
को-या डोळ्यात मात्र पर्जन्य ज्वलंत हे ।

दंभाचा चमत्कार ,दुनियेचि लोळणे
पुज्यांना हिणवुनी भस्माळलेले वंदय हे ।

डुंबुनी गंगेतिरी पापखाते झडती नवी
ज्योत भडकल्या मात्र मंद यद्न्यकुंड हे ।

मुढांना आत्मविश्वास बुद्धीवान साशंक हे
संकुचित धनाढ्य मात्र दयाळु इथे रंक हे ।

कशा फ़ुका उडविता धुराळॆ एकिची
सौजन्य दावणी ,अन तंटे बेबंद हे ।

-प्राजक्त

Popular Posts