शैक्षणिक गुणवत्ता एवढा एकच गुण आज पुढे जाण्यासाठी पुरेसा ठरत नाही. नीट लक्षात घेतलं तर जाणवतंय, की कागदावर सिद्ध झालेली बुद्धिमत्ता आहे, कष्टांची तयारी आहे; पण विविध स्वभावाच्या व्यक्तींबरोबर एकत्रित काम करता येत नाही, आपले विचार नेमकेपणाने मांडता येत नाहीत, आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातला वेग झेपत नाहीए, आपल्याकडे असलेली जुनी कौशल्ये कालबाह्य होण्याआधी नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची तयारी- ती तर अजिबातच नाही. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच माणसाबरोबर, माणसांना एकत्र करून त्यातून संवाद साधत दर्जेदार करण्याची क्षमता ज्याच्याकडे असेल त्याला करियरमधील सर्वोत्तम संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या बदलत्या काळात तंत्रज्ञानाबरोबरच "माणसांशी' संवाद साधणं, जुळवून घेणंही आवश्यक आहे आणि त्यासाठी विकसित करायला हवीत आपल्यामधील सॉफ्ट स्कील्स.
""सॉफ्ट स्कील्स म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावी ठरू शकणाऱ्या असंख्य छटा, समूहात वावरतानाचे आत्मभान आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी घेतलेले विशिष्ट कष्ट.''
सॉफ्टस्कील्स आत्मसात करण्यामुळे आपला "करिअर ग्राफ' उंचावतोच; शिवाय व्यक्तिगत प्रगती होऊन आर्थिक व मानसिकदृष्ट्या संपन्न जीवन जगणे शक्य होते.
आपल्या प्रत्येकाला करियरमध्ये हार्ड स्कील्स व सॉफ्टस्कील्सची गरज असते. हार्डस्कील्स म्हणजेच आपली शारीरिक क्षमता व उपलब्ध व वापरात असलेले तंत्रज्ञान यांच्याशी निगडित कौशल्य. व्यावसायिक व व्यावहारिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हार्ड स्कील्सबरोबरच सॉफ्ट स्कील्स वापरणे आपल्या फायद्याचे ठरते. ही सॉफ्टस्कील्स प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित विकसित करता येतात, ही महत्त्वाची सॉफ्ट स्कील्स पुढीलप्रमाणे-
सर्जनशीलता - सर्जन म्हणजेच नवनिर्मिती. आपल्या प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात सर्जनशीलता असते. आपल्या रोजच्या कामासंदर्भात नावीन्य व थोडी कल्पकता आणली, तर कामाचा कंटाळा न येता कामातील गोडी टिकून राहते.
प्रेरणा - आपल्या कृतीमागचा हेतू म्हणजेच प्रेरणा ः सकारात्मक प्रेरणा ध्येयापर्यंत पोचविण्यास मदत करते. बाह्य प्रेरणेपेक्षा अंतःप्रेरणेमुळे कामात रस निर्माण होतो, कामाची गुणवत्ता व दर्जा सुधारतो. आपल्या कार्यप्रवणतेला विरोध करणारे अडथळा ठरणारे घटक अंतःप्रेरणेच्या साह्याने दूर करता येतात.
भावनिक बुद्धिमत्ता - आपल्या सर्वांना परिचित असलेली बुद्धिमत्ता ही उपजत असते; पण भावनिक बुद्धिमत्ता मात्र प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. भावनिक बुद्धिमत्ता ही व्यक्तीला समाजाभिमुख बनविते. भावनांचा वापर व हाताळणी कौशल्यपूर्णरीत्या केल्यास स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेऊन त्या नियंत्रित करणे सहज शक्य होते.
निर्णयप्रक्रिया - योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, ही तशी अवघड गोष्ट आहे. पण आपल्या उद्दिष्टांची नेमकी जाणीव विचारांमधील सकारात्मकता, उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन तर्कसंगतपणे निर्णय घेता येतो. आपण घेतलेल्या निर्णयानुसार ठाम वागण्याची सवय व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कार्यप्रवृत्त करते.
प्रभावी देहबोली - कामाच्या ठिकाणी योग्य रीतीने संवाद साधणे आवश्यक असते. त्यामध्ये बोलणं आणि शारीरिक हालचाली यांची एकत्रित सांगड असते. शारीरिक हालचाली म्हणजेच आपली देहबोली. या देहबोलीतून आपल्या प्रत्येकाच्या मनातील गोष्टी नकळतपणे दृश्यरूपात प्रकट होत असतात. आपल्याला इतरांबरोबर सौहार्द्रता व मैत्री वाढविण्यासाठी प्रभावी देहबोली वापरणे व त्याचा अर्थ जाणून घेणे, खूप मदतीचे ठरते. आपल्या देहबोलीचा योग्य वापर करून आपण इतरांशी उत्तम संवाद साधू शकतो.
समस्यापरिहार कौशल्य - बऱ्याच वेळा आपल्याला आपले ध्येय किंवा उद्दिष्ट ज्ञात असूनसुद्धा त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा समस्या निर्माण होते. बऱ्याचदा आपण चाकोरीबद्ध वागत असतो. त्यामुळे आपल्या कार्यशैलीत व वागण्यात ताठरता येते. त्यामुळे समस्या न सुटता, गुंतागुंतीची बनते. पण विचारातील लवचिकता व विविध पर्यंयाचा वापर केला, तर समस्या सुटणे सहज शक्य होते.
संघभावना जोपासणे - कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी समजूनउमजून संवाद साधताना आपल्या सहकाऱ्यांचे काम करण्याचे "स्पिरिट' आपल्यामुळे कमी होऊ नये याची काळजी घेता यायला हवी. जर कामाच्या ठिकाणी आपल्या टीममध्ये काही दोष असतील, तर ते कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कारण जर टीममध्ये आपण काम करत असू, तर यश-अपयश सारं काही टीमच असते. आपल्याला येणाऱ्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांना शिकविण्याची तयारी आपल्याकडे हवीच; पण इतरांकडील नवीन गोष्टी आपल्याला शिकून घेता आल्या पाहिजेत. त्यामुळे संघभावना जोपासण्यासाठी आपण सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवताना आपली कौशल्यं इतरांनाही कशी आत्मसात करता येतील यासाठी आवश्यक असणारी प्रयत्नशील वृत्ती जोपासायला हवी.
करिअरग्राफ उंचावताना ही मूलभूत सॉफ्टस्कील्स आपल्याला माहीत नसणं आणि वापरता येणं आवश्यक आहे. या स्कील्सच्या बरोबरीनं वाटाघाटी करण्याचं (निगोसिएशन) कौशल्य, बिझनेस एटिकेट्स, कामातील प्रामाणिकपणा, नेतृत्वक्षमता, सतत शिकण्याची वृत्ती, कामासंदर्भात पूर्वतयारी व नियोजनतज्ज्ञांची गरज असते. आपण प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ही वेगवेगळी सॉफ्टस्कील्स विकसित केली तर करियरचा ग्राफ हा नेहमी उंचावत चाललेला दिसेल, हे नक्की !
एज्युकेशन लोन.? कुणी ? का? कधी घ्यावं.?
12 years ago